(Navratri) नवरात्रीचा दुसरा दिवस, आणि या दिवशी आपण देवीच्या दुसऱ्या रूपाची, ब्रह्मचारिणीची पूजा करतो. ब्रह्मचारिणी ही देवी तपश्चर्येचे प्रतीक आहे, जिच्या आराधनेतून संयम आणि सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शरीरापासून अलिप्तता नसून, “आपण शरीर नाही तर आपला खरा स्वरूप ज्योतीसारखा आहे” ही जाणिवेने जगणं, आणि याच सजगतेतून आपण खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्य पाळतो.
Table of Contents
मंत्र
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥
ज्यांच्या हातात कमंडलू आणि अक्षयमाला आहे अशा परम तपस्विनी, ब्रह्मचारिणी देवी माझ्यावर कृपा करोत. हा मंत्र ब्रह्मचारिणी देवीची स्तुती करून तिच्या आशीर्वादाची याचना करतो, ज्यामुळे भक्तांना संयम, आत्मशक्ती आणि साधनेत यश मिळवता येईल.
अर्थ
ब्रम्हचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रम्हचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे , “आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे,आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे” या सजगतेसह जीवन जगत असाल तेंव्हा तुम्ही ब्रम्हचर्यात असता.
जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल.जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल-हे ब्रम्हचर्य होय.
आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये ब्रम्हचर्याचे गुण जागृत होऊ लागतात.आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते,जो आपला मूळ स्वभाव आहे.आणि जेंव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेंव्हाच आपण शूर,निडर,पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो.
अगदी बरोबर म्हंटलय “आपण शरीर नसून ज्योती स्वरूप आहोत,” या विचाराने अनेक एसिड हल्ल्यात पीडित महिलांनी आपलं जीवन नव्यानं घडवलं आहे, जसं लक्ष्मी अग्रवालने केलं आहे. तिने जगाला दाखवून दिलं की “हौसलों में उड़ान अब भी बाकी है.”
अॅसिड हल्ला
मिटाई है लाली होठों की मेरी
पर होठों की मुस्कान अब भी बाकी है
काली हूं मैं, मैं दुर्गा भी हूं
हौसलों में उड़ान अब भी बाकी है
अॅसिड हल्ला म्हणजे केवळ शरीरावर झालेला हल्ला नसून, तो एका व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वावर आघात करतो.
आपल्याला लक्ष्मी अग्रवालसारख्या अनेक स्त्रियांनी या हल्ल्यानंतर उभं राहत, आपला नवा प्रवास सुरू करताना पाहिलं आहे. लक्ष्मीने केवळ स्वतःचा लढा लढला नाही, तर अनेकांना प्रेरणा दिली.
आकडेवारी : NCRB
NCRB ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2014 ते 2018 दरम्यान, देशात अॅसिड हल्ल्यात 1,483 बळी गेले आहेत. अॅसिड हल्ल्यांच्या बाबतीत 10 सर्वात वाईट राज्यांमध्ये सातत्याने क्रमवारीत असलेले उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली सुरुवातीला आहेत.
2024 मध्ये भारतात महिलांवरील अॅसिड हल्ल्यांमध्ये काही सुधारणा झाल्या असल्या तरी अजूनही हा गुन्हा महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा एक गंभीर प्रकार आहे. 2021 च्या राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) नुसार, दरवर्षी सुमारे 200 अॅसिड हल्ल्यांचे प्रकरण नोंदवले जातात, ज्यामध्ये 80% हल्ल्यांमध्ये पीडित महिला असतात. विशेष म्हणजे, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश हे राज्ये सतत अॅसिड हल्ल्यांच्या आघाडीवर राहिले आहेत.
गेल्या 5 वर्षांत (2018-2023) सुमारे 1,362 हल्ले नोंदवले गेले आहेत, परंतु अनेक घटनांची नोंद होत नाही, ज्यामुळे हा आकडा अधिक असू शकतो. या हल्ल्यांचे बळी कायमस्वरूपी शारीरिक आणि मानसिक जखमा सोसतात. त्वचेवर तसेच अंतर्गत अवयवांवर होणारे गंभीर परिणाम तसेच समाजातील अपमानामुळे मानसिक आघात सुद्धा होतो.
भारत सरकारने अॅसिड हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही कठोर कायदे केले आहेत, ज्यात अॅसिडच्या विक्रीवर कडक नियंत्रण ठेवण्याची तरतूद आहे. परंतु, अनेक ठिकाणी अजूनही अॅसिड सहजगत्या मिळत असल्याचे दिसून येते. अॅसिड हल्ल्याच्या घटनांमध्ये न्याय मिळवणे कठीण आहे कारण अनेक प्रकरणे न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असतात. 2021 मध्ये केवळ 2.46% अॅसिड हल्ल्यांची प्रकरणे निकाली निघाली.
समाज
अॅसिड अटैक हा सामान्यतः महिलांविरूद्ध केलेला एक घृणास्पद गुन्हा आहे तिला विकृत करण्याचा किंवा मारण्याचा हेतू ह्या मध्ये असतो. महिला ह्या समाजातील महत्त्वाचा भाग आहेत , त्या ह्या सृष्टीच्या निर्माता आहेत, त्या जीवनदाता आहेत, पण दुर्दैवाने, त्यांना वेगवेगळ्या क्रूरतेच्या नावाखाली आपला जीव गमवावा लागला आहे.
कधी लग्नासाठी नकार दिला म्हणून तर कधी अन्याया विरोधात पुरुष प्रधान समाजात आवाज उंचावला म्हणून पण माणसाच्या दुर्गम बुद्धीला एवढे कसे उमगत नाही की त्या स्त्री ला त्यांनतर किती शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.
या अशा महिलांच्या कहाण्या आपल्या समाजाच्या संकुचित विचारसरणीवर प्रकाश टाकतात. समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे आपल्याला याचं भान येतं की आपण कितीही देवीच्या रुपांची पूजा केली तरीही, समाजात महिलांना सन्मान आणि सुरक्षितता दिली जात नाही, हे सत्य आहे.
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानलं जातं, पण तिचा खरा आदर तिला प्रत्यक्षात मिळतो का? असिड हल्ला करणाऱ्या माणसांनी आपल्या विकृत मानसिकतेतून स्त्रीच्या सौंदर्यावर हल्ला केला, पण तिच्या मनाच्या शक्तीवर हल्ला करू शकले नाहीत.
"जो मनुष्य इतरांची पूजा करतो, पण आपल्याच कुटुंबातील स्त्रियांना सन्मान देत नाही, त्याची पूजा व्यर्थ आहे,"
असे संत तुकारामांनी एके ठिकाणी सांगितले आहे. हे वचन आजही समाजाला मार्गदर्शक आहे.
लक्ष्मी अगरवाल, हसीना हुसेन, सोनाली मुखर्जी, प्रीती राठी यांसारख्या अनेक एसिड हल्ला पीडित महिलांनी या क्रूरतेच्या विरोधात आवाज उठवला आहे आणि त्यांचे जीवन एक प्रेरणादायी लढा बनले आहे. यामुळे आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते – स्त्री शक्तीची पूजा करायची तर तिचा आदरही करायला हवा.
समाजाला गरज आहे साक्षरतेची आणि चांगल्या विचारांची तर मग स्त्री शक्तीच्या पूजे सोबत तिचा आदर ही करुया.
लेख आवडल्यास तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि टिप्पणी पोस्ट करा Newser Friendly आता WhatsApp चॅनेलवर उपलब्ध आहे. तुमच्या चॅटवर न्यूजर फ्रेंडली कडून सर्व नवीनतम लेख मिळविण्यासाठी लिंकवर क्लिक करा