बदलापुरात चिमुकल्या कळ्या ओरबाडल्या: बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक

उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना आता ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील आदर्श विद्या मंदिर ह्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलीय, हि घटना १३ तारखेला घडली असून प्रशासनाने कश्या प्रकारे हलगर्जीपणा केला आणि त्यांनतर जनतेच्या आक्रोशाने कशी गल्ली पासून दिल्ली भारावून सोडली, पाहुयात…

नेमकं काय घडलं ?

३ वर्ष ८ महिन्याची मुलगी जेव्हा आपल्या आई कडे जाते आणि सांगते, “ए आई मला शूच्या जागी मुंग्या चावताहेत” असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं .

तेव्हा आईने त्वरित मुलीला दुपारी १२ च्या सुमारास शासकीय रुग्णालयात नेलं तिथे तिची तपासणी झाली. तपासणी देखील सहजा सहजी झाली नाही त्यात हि १०-१२ तास विलंब करण्यात आला. पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्य म्हणाले, “पहिले तर FIR घ्यायला पोलिसांनी खूप वेळ घेतला. आई आणि त्यांचे वडील (पीडितेचे आजोबा) आणि लहान मुलीला 12 तास उभं ठेवलं. आम्ही पोलीस स्टेशनला सकाळी 11.30 वाजता पोहोचलो आणि रात्री उशिरापर्यंत त्याच ठिकाणी होतो. नंतर आम्ही शाळेतही पोहोचलो. पण त्यांनी आम्हाला काहीच सहकार्य केले नाही.”

तपासणीत असं समोर आलं कि मुलीवर लैंगिक छळ झाले आहेत. अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाचा हिंस्त्रपणा इतका भयानक होता कि पीडित चिमुकलीच्या आतड्यां पर्यंत दुखापत झाली आहे.

“पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी सुरुवातीला खासगी हाॅस्पिटलमध्ये केली. तसंच डाॅक्टरांनी नेमकं काय झालंय तिच्यासोबत हे लिहून दिलं तरीही पोलीस दखल घेत नव्हते,” असंही ते म्हणाले.

नराधम अक्षय शिंदे

शाळेतील अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले. तो शाळेत प्रसाधनगृह स्वच्छ करण्याचे काम करत असे. दुसऱ्या सहा वर्षाच्या मुलीवर देखील असा निघृण, पाशवी प्रकार करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. घटनेत एक च नाही तर जास्त मुली पीडित आहेत असा आरोप देखील त्याच्यावर आहे.

त्याच प्रकारे आरोपी हा हिस्टरी शिटर(जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार गुन्हा करते तेव्हा पोलिस निरीक्षक एस. पी किंवा एस. एस. पी यांना अहवाल पाठवतात.  हिस्ट्री शीट एस. पी किंवा एस. एस. पी च्या आदेशाने उघडते.) असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अर्थातच जर तो सराईत गुन्हेगार आहे तर त्याला शाळे सारख्या संस्थेवर कामाला का ठेवले असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

वाचा कशी फुटली?

मुलीची मेडिकल झाल्यानंतर पालकांनी शाळेत तक्रार केली त्यानंतर हि शाळेने तोंड बंद करून ठेवलं होत. शाळेतील CCTV  फुटेज ची विचारणा केली असता ते बंद असल्याचे कारण दिले गेले. ह्या नंतर जेव्हा पालकांनी पोलीस स्टेशन येथे धाव घेत गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी सुद्धा १५-१६ तास गुन्ह्याची नोंद घेण्यास नकार दिला. ह्या नंतर पालकांनी बदलापूर शहरातील म. न.से  कडे मदतीची हाक दिली. Adv. जयेश वाणी ह्यांनी जेव्हा X ह्या प्लॅटफॉर्म वर ब्लॉग लिहिला तेव्हा प्रकरणाला वाचा फुटली. 

आंदोलन

२० ऑगस्ट च्या पहाटे पासून च जनतेने आदर्श शाळे भोवती आणि बदलापूर रेल्वे स्थानक येथे घेरा करण्यास सुरुवात केली. शाळेबाहेर हजारोंच्या संख्येने आंदोलन कर्त्यांनी घेराव टाकला, भर पावसात दिवसभर सर्व बदलापूरकरांनी एकता दाखवत चिमुकलीच्या न्यायासाठी आणि आरोपीला त्वरित कठोरात कठोर शिक्षा व्हावी ह्याची मागणी प्रशासना समोर मांडली आहे.

आंदोलकांनी 20 ऑगस्ट रोजी ( मंगळवार) बदलापूर रेल्वे स्थानकावर निदर्शनं केली. या आंदोलनादरम्यान दगडफेक देखील झाली. या प्रकरणी पोलिसांनी 1500 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे तर 60 जणांना अटकही केली आहे.
त्यानंतर बदलापूरमधील इंटरनेट सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहे.

शाळेची पदाधिकारी राजकीय पक्षाशी संबंधित आहे का?

‘शाळेच्या संचालक मंडळाचे सदस्य हे भाजपशी संबंधित असल्यामुळे तक्रार नोंदवण्यास उशीर झाला. तसेच, तक्रार नोंदवण्यात येऊ नये असा दबाव पोलिसांवर होता,’ असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबातील या सदस्याने म्हटले की “आमच्या माहितीनुसार शाळेचे एक ट्रस्टी बीजेपीचे आहेत. शाळेमध्ये पोलीस गेले होते. तिथे काही बोलणं झालं असेल त्यांचं शाळेच्या प्रशासनासोबत तर माहिती नाही. राजकीय दबाव होता. आम्ही इथल्या काही लोकांना सांगितलं तेव्हा कुठे पोलिसांनी केस नोंदवली. नंतर पोलीस आयुक्त आले मग गुन्हा दाखल झाला.”

‘शाळेच्या विश्वस्त मंडळात भाजपशी संबंधित व्यक्तीचा समावेश आहे पण त्यांनी कुठलाही राजकीय दबाव टाकला नाही’, असे शाळेच्या विश्वस्त मंडळाचे सचिव तुषार आपटे यांनी सांगितले.

आपटे म्हणाले, “हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय दबाव होता असं आरोप होतोय त्यात तथ्य नाही. उलट आम्ही पालक आणि पोलिसांना सहकार्य केलं. संस्था तुमच्या पाठीशी आहे असं आम्ही पालकांना सांगितलं.”

आरोपी कोण ?

आरोपी फक्त अक्षय नाही…

शालेय प्रशासन, संस्थाचालक, राजकीय नेते, पोलीस प्रशासन हे देखील तितकेच जबाबदार आहेत.

४ वर्षांचे मुलं जेव्हा शौचालयात जातात तेव्हा त्यांच्या सोबत महिला देखरेखी साठी नव्हत्या.

अक्षय शिंदे ला कामावर ठेवण्या आधी त्याच्या क्रिमिनल पार्शवभूमी ची कोणतीही चौकशी केली नाही.

CCTV बंद अवस्थेत ठेवले.

सती सावित्री कमिटी नाही.

मुलींच्या प्रसाधन गुहेत पुरुषाला परवानगी कशी?पालकांनी तक्रार केल्यानंतर हि कोणत्या हि प्रकारची action घेतली नाही.

शाळेचं नाव वाचवण्यासाठी प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले.

राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला तर नाहीच वरून पत्रकारांना अर्वाच्च भाषेत ” तू अशी बातमी बनवते जस कि तुझ्यावर च बलात्कार झालाय” अशी धमकी दिली जात आहे. बातमी कव्हर करू नये ह्या साठी पुरे पूर प्रयत्न केले जात आहेत.

पोलीस प्रशासनाने देखील गुन्ह्याची नोंद त्वरित केली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलापूर महानगरपालिकेच्या इमारतीचे उदघाटन करण्यासाठी आणि ध्वज फडकवण्याचा येणार असल्याने वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हि घटना बाहेर येऊ नये ह्याच दिशेने हालचाल केली.

बदलापूरकरांची प्रतिक्रिया

ह्या सर्व गोष्टीचा संताप घेत बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. बदलापुरातल्या अत्याचाराच्या या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगाराला तातडीनं शिक्षा व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, लोकांमधील संताप पाहता, पोलीसही हतबल अवस्थेत दिसून येत होती.

adarsh vidya mandir school

आदर्श शाळेसमोर जमावबंदी करण्यासाठी पोलिसांनी अश्रूगोळ्यांचा (Tear gas ) वापर केला. ह्यात अनेकांचे पाय भाजले गेले आणि चेंगरा चेंगरी मध्ये महिलांच्या डोक्याला सुद्धा दुखापत झाली. वैतागलेल्या युवकाने तोच अश्रू बॉम्ब उचलून शाळेच्या गेटच्या आत फेकला. गेट बाहेर पहारा देत असलेल्या पोलिसांनाच तिथून पळ काढावी लागली.

रेल्वे रुळावर जमाव बंदी करण्यासाठी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर लाठी चार्ज केला. यावेळी पोलीस आणि आंदोलक अशा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.

प्रशासनाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच, गुन्हा दाखल करण्यास प्रारंभच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

शिवाय, शाळेनेही या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना निलंबित केले आहे.

“अशा घटना होऊ नयेत, यासाठी कायमस्वरुपी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच, आरोपीला कठोर शासन व्हावे, यादृष्टीने खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा,” असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, “बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे.”

तसंच आरोपीला व्हीसीद्वारे कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपीच्या घराचीही तोडफोड काही कार्यकर्त्यांनी केल्याचं समोर आलं.

वकील नेमणुकीवर विवाद

या प्रकरणासाठी सरकारने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीवर विरोधी पक्षाने आक्षेप नोंदवला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्ट्वार यांनी उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील म्हणून नियुक्तीवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली आहे. या वकिलाने निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर याला जबाबदार कोण? याचे उत्तर सरकारने दिलं पाहिजे.”

अश्याच बातम्यांसाठी वाचत रहा NEWSER FRIENDLY