Site icon Newser Friendly

नवरात्री – दिवस ८: स्त्री शक्तीची पूजा – महागौरी

Source : Pinterest

Navratri – महागौरी श्लोक

पूर्णन्दु निभां गौरी सोमचक्रस्थितां अष्टमं महागौरी त्रिनेत्राम्।

वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥

महागौरी

गौर म्हणजे गोरा,सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतिक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते.

तीच गौरी, तीच काली, त्याच देवी ची रूप

मग मुलगी, बायको, सुन ही गोरी च असावी हा अट्टहास का?

नाही, म्हणजे तिच्या मनापेक्षा अधिक महत्व तुम्ही जर तिच्या शारीरिक सुंदरतेला देत असाल तर मग नवरात्री मध्ये तिला पूजन्या मागचे कारण सुद्धा स्पष्ट करून घ्या, नाही का?

आपली मानसिकता रंगाधिष्ठित आहे. गोरा रंग असलेली व्यक्ती ही उच्चवर्गीयच असेल, अशी समजूत खोलवर रुजली आहे. त्या समजुतीतून सतत गौर रंगाविषयीची आसक्ती वाढत गेली आहे. ‘काळा म्हणजे दलित’ असं समजण्याची मानसिकता बदलता न येणारी आहे. ही फक्त भारतातच आहे, असं नाही तर जगभरात वर्णद्वेष आणि त्यातून उद्भभवलेल्या संघर्षांचा इतिहास हा भयावह आणि कधीही भरून न येणाऱ्या जखमेसारखा आहे.

Source : Pinterest

आजही आपल्याकडे अधिकाधिक लोकांना गोरं होण्याची ओढ असते. भारतात तर खेड्यापाड्यांत जिथे उन्हाने त्वचा रापलेली असते, तिथल्याही पुरुषांना गोरी बायको हवी असते. मग जन्माने सावळी असलेल्या बहुतांश मुली त्वचा गोरी करण्यासाठी विशिष्ट क्रीम लावतात. ती क्रीम फायदेशीर आहे, हे त्यांच्या आवडीचे हिरो-हिरोइन्स जाहिरातीतून सातत्याने सांगतात. विवाहविषयक जाहिरातींपासून ते हिंदी सिनेमात हिरोईन होण्यापर्यंत गोरा रंग अधिक पसंतीचा ठरत असतो. मग सावळ्या रंगाच्या अभिनेत्रींकडे कलात्मक सिनेमांचा पर्याय उरतो आणि गोरी हिरोईन व्यावसायिक सिनेमांची नायिका ठरते.

स्मिता पाटीलपासून ते राधिका आपटे अशी कित्येक उदाहरणं सहज डोळ्यासमोरून जातील. मॉडेलिंगमध्ये मधु सप्रे, मुग्धा गोडसे सोडल्या तर कित्येक जणींच्या संधी केवळ त्यांच्या रंगामुळे हुकल्या आहेत. प्रियंका चोप्रापासून ते झाशी की राणी साकारणाऱ्या उल्का गुप्तापर्यंत त्यांचा सावळा रंग अभिनयक्षेत्रात स्थिरावण्यासाठी अडथळा ठरल्याची उदाहरणं आहेत. शिवाय गुणवत्ता असूनही केवळ गोरी त्वचा आहे, म्हणून मानधनातही डावं-उजवं झाल्याचे किस्सेही सिनेमा, नाटक, टीव्ही अशा माध्यमांमध्ये आहेत. त्याचा खोलवर परिणाम तळागाळापर्यंत झाल्याचं आपण सहज पाहतो. या रंगभेदाला आपण सहजपणे खतपाणी घालत असतो.

गोऱ्या रंगाला काही शोभून दिसतं, असं म्हणताना आपण सावळ्या रंगावर अन्याय करतोय, याचा पत्ताही आपल्याला नसतो. हीच मानसिकता समूहाची झाली की त्यातून रंगविद्वेष किंवा वंशवाद निर्माण होतो.

रंगभेदी समाज संपवण्यासाठी कायदा होण्याची गरज आपण बोलून दाखवत असलो तरी गरज आहे ती मानसिकता बदलण्याची.

आणि ती बदलण्याची योग्य वेळ हीच आहे.

source : Pinterest

भारतीय संविधानातील कायदे आणि कलमे

भारतातील कायद्यांमध्ये वर्णद्वेषाविरोधी तरतुदी समाविष्ट आहेत. भारतीय संविधान आणि भारतीय दंड संहिता (IPC) मधील काही महत्वाचे कायदे खालीलप्रमाणे आहेत:

१. भारतीय संविधान, अनुच्छेद १५

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १५ नुसार, “राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांवरून भेदभाव करू शकत नाही.” हा अनुच्छेद वर्णद्वेषाविरोधातील महत्त्वाचा घटक आहे, जो प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार प्रदान करतो.

२. अनुच्छेद १७ – अस्पृश्यता विरोधी कलम

अनुच्छेद १७ अस्पृश्यतेचे उच्चाटन करते आणि अस्पृश्यता पालन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार देतो. अस्पृश्यता ही वर्णद्वेषाचे मूळ स्वरूप आहे, आणि या कलमाने ती संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

३. भारतीय दंड संहिता (IPC), कलम १५३-A

कलम १५३-A नुसार, धर्म, वंश, जन्मस्थान, भाषा इत्यादीवरून दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृत्याला दंडात्मक अपराध मानले जाते. जातीय किंवा वर्णद्वेषाचे उद्गार काढल्यास, दोषीला या कायद्याखाली शिक्षा होऊ शकते.

४. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ (SC/ST Act)

हा कायदा अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचार थांबवण्यासाठी विशेषतः तयार केला गेला आहे. यात अपमान, भेदभाव, आणि हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाते.

भारतामध्ये वर्णद्वेषाची समस्या अद्यापही अस्तित्वात आहे, परंतु संविधानिक तरतुदी आणि कायदे या समस्येवर मात करण्यासाठी प्रभावी साधने आहेत. कायद्याची अंमलबजावणी, सामाजिक जागरूकता, आणि न्यायसंस्थेचे योगदान या त्रिसूत्रीवर हा लढा पुढे नेला जाऊ शकतो. भारतीय समाजाच्या एकसंधतेसाठी प्रत्येकाने या समस्येची गांभीर्याने जाणीव ठेवून त्यावर प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

लेख आवडल्यास तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि टिप्पणी पोस्ट करा Newser Friendly आता WhatsApp चॅनेलवर उपलब्ध आहे. तुमच्या चॅटवर न्यूजर फ्रेंडली कडून सर्व नवीनतम लेख मिळविण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

Exit mobile version